आश्रमगीत
हे वंद्य आश्रमात्वा माझे प्रणाम घ्यावे या बालबालिकांना सत्स्फूर्ति लागि द्यावें ।। धृ।।
या सिंह तोरण्याच्या उत्तुंग शैलमाला ।
राहोत पाठिराख्या करि गुंफु नी कराला ।। १ ।।
ही मंद मंद वाहो सरिता मुठा सुमाता ।
बाहूनि आणी नेमे सुमगंध युक्त वाता ।।२।।
ही हासरी सदाची क्षेत्रे अशी डुलोत असहाय बालिकांच्या हृदिंशक्ति साठवीत ।।३।।
हा पूर्व पर्वतीचा गिरीजा कृपा कटाक्ष ।
पावित्र्य रक्षणार्थी राहो सदैव दक्ष ।।।४।।
गुरुराज थोर अण्णा तुज लाभले महर्षी ।
आशीर्वचें तयांच्या नांदोत सर्व हर्षी ।।। ५।।
पावित्र्य देवतांचे व्रतितत्व तापसांचे ।
मांगल्य प्रेमगृहीचे नांदो असें सदाचे ।।६।।
गुरुशिष्य भक्ति राहो अतिपूज्य आश्रमींची ।
जी दूर ना कधीही होणार या जीवींची ।।७।।
या पुण्य हिंदभूच्या सत्कीर्तिमंदिराची ।
राखावया प्रतिष्ठा चित्शक्ती आश्रमींची ।।८।।
ध्यानी मनी म्हणोनी स्मरणार या चरित्रा ।
लवंवीन नम्र माथा हे आश्रमा पवित्रा ।। ९ ।।
हे वंद्य आश्रमात्वा माझे प्रणाम घ्यावे ।।धृ।।